Gold Rate Future India : ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावाने उच्चांक गाठल्यामुळे किरकोळ बाजारातल्या खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे. तर काही ग्राहक भाव वाढल्यामुळे आपल्याकडचं सोनं विक्री करत आहेत. सोन्याचे भाव सर्वसामान्यांना परवडत नाहीत, हे वेगळं सांगायला नको. पण गुढीपाडव्याला थोडं तरी सोनं खरेदी करण्याची परंपरा सर्वसामान्यच सर्वाधिक पाळतात. महाराष्ट्र राज्य व्हॅल्यूअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम काळे यांच्या मते, 'गुढीपाडव्याला सोनं घरी आणलंच पाहिजे, अशी भावना आजही लोकांमध्ये खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे किमान १०० मिलीग्रॅम तरी सोनं खरेदी करण्याचा विचार होतो. तशी विचारणा काही ग्राहक आमच्याकडे करतात. पण सध्या एवढ्या कमी वजनाच्या सोन्याची विक्री होत नाही. पण सध्याचा भाववाढीचा प्रवास बघता पुढेमागे १०० मिलीग्रॅममध्येही सोनं उपलब्ध होऊ शकतं.'
Gold Rate Future India
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढला असला तरी लग्नासाठी सोनंखरेदीचा उत्साह कायम आहे.जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे मालक आनंद पेडणेकर म्हणाले की, 'यंदा एप्रिल, मे आणि जूनच्या मध्यापर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. भाव वाढल्यामुळे कमी वजनाच्या दागिन्यांना सध्या उठाव आहे. म्हणजे पूर्वी वधूसाठी २०० ते ३०० ग्रॅम सोनं खरेदी होत असे, ते आता १५० ग्रॅमपर्यंत खाली आलं आहे. म्हणजे सोनंखरेदीत २०% घट झाली आहे.'
गुढीपाडव्याला थोडं तरी सोनं घेणारे अनेक ग्राहक आहेत. पण या दिवशी लग्नाच्या दागिन्यांची ऑर्डर देणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला अशा ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात दिल्या जातील. कारण अक्षय्य तृतीयेपर्यंतच्या लग्नाची तयारी लोकांनी आत्तापासूनच सुरू केली आहे.
'दोन-अडीच महिन्यांपूर्वी ८१ ते ८३ हजार रुपयांपर्यंत असलेला सोन्याचा भाव खाली येईल, असं वाटत होतं. पण तो कमी होण्याऐवजी वाढला आहे. त्यामुळे आता भाव खाली येणार नाहीत, अस बनल आहे.' असंही पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.
थोडक्यात, गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तरुणाईचा कल
काही आई-वडिल आपल्या कमावत्या मुलींना पगार झाला की दर महिन्याला अर्धा ग्रॅम तरी सोनं घेण्याचा सल्ला देतात. कारण भविष्यात तिच्या लग्नाच्या वेळेस ते कामी येईल, असं निरीक्षण काळे नोंदवतात.जुनी पिढी सोनं खरेदी करण्यास महत्त्व देत होती. पण आजची तरुणाई त्याकडे फारसं गांभीर्याने बघतेच असं नाही. पण सोन्यातली गुंतवणूक देत असलेला परतावा बघून अनेक तरुण-तरुणी या राजधातूकडे आकर्षित होत आहेत.
'आज तरुणांचा सोन्याकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलला आहे. ते गुंतवणुकीचा सशक्त पर्याय म्हणून सोन्याकडे बघू लागले आहेत. सोन ही एकमेव अशी मालमता आहे, जिने वार्षिक २० ते ३०% दराने परतावा दिला आहे. आज माझ्या गुंतवणुकीच मूल्य एवढं असेल तर पुढच्या वर्षी ते किती असेल, याचा हिशेब करून अनेक तरुण सोन्याकडे वळत आहेत,' अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.
सोनं, चांदी आणि तांबंही वधारण्याची शक्यता
'नजीकच्या भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. प्रती 10 ग्रॅमचा भाव २०२५च्या जूनपर्यंत एक लाख रुपये तर डिसेंबरपर्यंत १.२५ लाख रुपयांपर्यंत शक्यता आहे,' अस भाकीत काळे यांनी केलं.सोन्याबरोबरच चांदीच्या दरांमध्येही वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोन आणि चांदीच्या भावातल अंतर लक्षणीयरित्या कमी झालं आहे. आगामी काळात तांब्याच्या भावातही मोठी वाढ होण्याचे अंदाज आहे. सोनं पाच टक्क्यांनी वाढल तर तांबं ५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहितीही काळे यांनी दिली.
सोनं खरेदी करावं का?
सध्याच्या परिस्थितीत सोन्याच्या किमतींमध्ये नुकतीच वाढ झाली आहे, त्यामुळे गुंतवणूकदार सुरुवातीला 'वेट अॅण्ड वॉच'चा दृष्टिकोन स्वीकारत आहेत. 'पण सोन्याचे भाव स्थिर झाल्यानंतर सोनंखरेदीकडचा कल वाढेल. कारण सोन्याला दीर्घकालीन मूल्य असून ते महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेपासून गुंतवणूकदारांचा बचाव करतं,' असं जैम अॅण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे (जीजेईपीसी) अध्यक्ष किरीट भन्साली म्हणाले.अमेरिकी धोरणाचे परिणाम (Gold Rate Future India)
• भारतीय किरकोळ विक्रेत्यांवर अमेरिकी धोरणाचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र, सोन्याच्या आणि हिन्यांच्या दागिन्यांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
• भारतातून विविध प्रकारचे दागिने अमेरिकेला निर्यात होतात. त्यात कट आणि पॉलिश केलेले हिरे (५६० कोटी डॉलर), हिरे असलेले सोन्याचे दागिने (२५५ कोटी डॉलर), सोन्याचे साधे दागिने (२६.७ कोटी डॉलर), प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (८३.१ कोटी डॉलर) आणि चांदीचे दागिने (३२ कोटी डॉलर) यांचा समावेश आहे.
• सोन्याचे दागिने आणि हिरे हे भारताच्या निर्यात महसुलात प्रमुख योगदान देणारे आहेत, त्यांना अमेरिकी धोरणाचा सर्वाधिक फटका बसू शकतो.
• सध्या अमेरिकेच्या सोन्याच्या दागिन्यांवर भारताकडून २०% कर आकारला जातो. तर अमेरिका भारतीय सोन्याच्या दागिन्यांवर ५.५% ते ७% कर आकारते.
• कट आणि पॉलिश केलेल्या अमेरिकी हिऱ्यांवर भारतात ५% कर लागतो, तर अमेरिका कुठलाही कर आकारत नाही. परस्पर शुल्क लागू झाल्यानंतर अमेरिकी बाजारपेठेतली भारतीय सोन्याच्या उत्पादनांची स्पर्धात्मकता लक्षणीयरित्या कमी होईल, अशी माहिती भन्साली यांनी दिली.
सोन्याचे भाव आणखी वाढतील का? (Gold Rate Future India)
जीजेईपीसीचे अध्यक्ष किरीट भन्साली यांनी सांगितलं की, 'नजीकच्या भविष्यात आर्थिक अनिश्चितता कायम राहिली आणि मध्यवर्ती बँकांनी व्याजदर कायम ठेवले किंवा कमी केले तर सोन्याच्या किमती कायम राहू शकतात किंवा त्यात वाढ होऊ शकते. पण आर्थिक स्थैर्य वाढलं आणि व्याजदरांमध्ये वाढ झाली तर सोन्याच्या किमती काही प्रमाणात खाली येऊ शकतात.'
पण एकंदर परिस्थिती बघितली तर सोन्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असं काही तज्ज्ञांचं मत आहे.
महाराष्ट्र राज्य व्हॅल्यूअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम काळे यांच्या मते, 'सध्या जागतिक भू-राजकीय परिस्थिती तणावाची आहे. तुर्कस्थानात अंतर्गत उठाव होण्याची शक्यता आहे. चीनच्या निर्यातीत मोठी घसरण झाली असून तिथली बेरोजगारी वाढत आहे. इस्रायलने गाझा पट्टीत पुन्हा हल्ले सुरू केलेत. येमन विमानतळाला अमेरिकेने लक्ष्य केलं आहे. या सर्व घटनांकडे बघितलं तर मे महिन्याच्या सुमारास एखाद्या ठिकाणी युद्धाची ठिणगी पडू शकते, असं मला वाटतं.'
जगातल्या अनेक मोठ्या बँका अडचणीत आल्या आहेत. युरोपावर मंदीचे गडद ढग जमा झाले असून ही मंदी १९३१ पेक्षा भयंकर असेल, असं बोललं जात आहे. या मंदीचे परिणाम एप्रिल-मे महिन्यात दिसायला सुरुवात होईल.
'जेव्हा सामरिक किंवा आर्थिक युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा धातूच तुम्हाला वाचवतो. म्हणूनच गेल्या काही दिवसांमध्ये चीनने ४२५ टन, भारताने १२५ टन सोनं खरेदी केलं आहे. इतर देशांनीसुद्धा आपला सोनेसाठा वाढवला आहे,' याकडेही काळे यांनी लक्ष वेधले.
यंदा पावसाची परिस्थिती कदाचित अनुकूल नसेल. भारतीय हवामान खात्याने मार्च संपत आला तरी अजून पावसाचं वेळपत्रक जाहीर केलेलं नाही. ही बाबही सोन्याच्या भावावर प्रभाव टाकणारी आहे.
'बाजारातले कल बघितले तर आपल्या असं लक्षात येतं की, अल्पकाळात भावात चढ-उतार होण्याची शक्यता असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकदारांसाठी सोनं हा पसंतीचा पर्याय आहे,' असं भन्साली यांनी नमूद केलं.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.