5) चुलीवरचा गावरान स्वाद (Highway Food)
चुलीवरचं आणि अस्सल घरगुती पद्धतीचं शाकाहारी; तसंच मांसाहारी जेवण जेवायचं असेल, तर कात्रज बोगद्यापासून दोन किमी अंतरावर शेतात एक खास ठिकाण आहे. ते म्हणजे 'शिंदे मटण खानावळ.' पुण्याहून साताऱ्याला जाताना कात्रजचा नवीन आणि जुना बोगदा ओलांडून पुढं आलो, की लगेच डाव्या हाताला 'गोगलवाडी' गावाचा फाटा आहे. या फाट्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर शेतातच 'शिंदे मटण खाणावळ' आहे. इथली खासियत म्हणजे ऑर्डरनंतरच खाद्यपदार्थ बनवायला घेतले जातात; त्यामुळे तुलनेनं थोड़ा अधिक वेळ लागतो. मात्र, पहिला घास खाल्ल्यावरच केलेल्या प्रतीक्षेचं चीज झालं, अशी भावना निर्माण होते. इथं मटण थाळी, चिकन थाळी आणि शाकाहारी थाळी मिळते. पापड आलेली चुलीवरची मोठी कडक भाकरी आणि मटण आळणी फ्राय इथं प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, बोल्हाई आणि बोकडाचं दोन्ही प्रकारचं मटण इथं मिळतं. शाकाहारी पदार्थांमध्ये पिठलं, भरलेलं वांगं, घेवड्याची आमटी, ठेचा, शेंगदाणा चटणी असा अस्सल गावरान बेत असतो. इथं गावाप्रमाणे भारतीय बैठकीत बसून घरगुती जेवणाचा आनंद घेता येतो.
कसं जाल?
कात्रज बोगद्यापासून पाचशे मीटर अंतरावर 'शिंदेवाडी' गाव आहे. तिथून एक ते दीड किलोमीटर अंतरावर 'गोगलवाड़ी' गाव आहे. तिथंच रस्त्याच्या कडेला शेतात 'शिंदे मटण खानावळ' आहे.6) 'आनंदा' ची लज्जतदार मिसळ (Highway Food)
कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या किंवा सातारा महामार्गानं प्रवास करणाऱ्या खवय्यांचा साताऱ्यातील 'आनंदा' ची मिसळ खाण्यासाठी थांबा असतो. ही मिसळ गेल्या ७५ वर्षापासून प्रसिद्ध असून, महामार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पावलं आवर्जून या मिसळच्या शोधात 'चंद्रविलास भुवन' कड़े वळतात. इथं मिसळीसह सर्व प्रकारचे शाकाहारी पदार्थ मिळत असल्यानं महामार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे खादाडीसाठी हक्काचं ठिकाण झालं आहे. शंकरलाल जोशी यांनी ७५ वर्षापूर्वी 'चंद्रविलास भुवन' ची सुरुवात केली होती, आता या मिसळीचा नावलौकिक 'आनंदा' ची मिसळ म्हणून झाला आहे. हा व्यवसाय आता जोशी यांची तिसरी पिडी सांभाळत असून, सातारा शहरात या रेस्तरॉँच्या तीन शाखा सध्या सुरू आहेत. इथं मिसळीबरोबरच पुरी-भाजी, साबुदाणा वडा, खोबरा पॅटिस, पॅटिस साबुदाणा मिक्स वडा या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. 'चंद्रविलास गार्लिक स्पेशल' डोसा, मेथी गार्लिक डोसा, चॉकलेट डोसा, कोकोनट हनी डोसा, तूप मसाला डोसा, रवा मसाला डोसा, ओनियन उत्तपम, मसाला उत्तपम, कोकोनट हनी उत्तपम या प्रकारच्या दाक्षिणात्य पदार्थांची चवही इथ चाखता येते. साताऱ्यातल्या पोवई नाका इथं असलेल्या या हॉटेलशेजारी दुसरी शाखा असून, तिथं शाकाहारी जेवण उपलब्ध आहे.
फरसाणचा 'फॉर्म्युला'...
मिसळीसाठी लागणारं फरसाण बाहेरून न आणता स्वतः तयार करण्याचा निर्णय २५ वर्षापूर्वी घेण्यात आला. मिसळीबरोबरच इथल फरसाणही प्रसिद्ध आहे. फरसाणमध्ये पापडी, गाठी, शेव, चिवडा, तळलेले शेंगदाणे, खारी बुंदी असे पदार्थ असतात. हे पदार्थ तयार करताना मसाला आणि मीठ कमी प्रमाणात वापरलं जातं. बेसन पीठ आणि त्यामध्ये घालण्यात येणारे मसाले यांचा खास 'चंद्रविलास फॉर्म्युला' आहे. एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरलं जात नाही.कस जाल?
सातारा शहरात प्रवेश केल्यानंतर वाढ़े फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर पोवई नाका, शिवाजी चौक इथं 'चंद्रविलास भुवन' आहे.
7) पिठलं-भाकरी आणि थालीपीठाची 'रुची' (Highway Food)
पुण्याकडून सातारा, कोल्हापूरच्या दिशेनं जाताना सुमारे ६५ ते ७० किलोमीटर अंतरावर सुरूर या गावाजवळ रस्त्याच्या उजव्या-डाव्या बाजूला असलेल्या 'अभिरुची' या हॉटेलनं प्रवाशांच्या सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतची 'रुची' जपली आहे. मराठमोळ्या पदार्थासह उडपी आणि लज्जतदार पंजाबी पदार्थ इथं मिळतात. त्यातही इथलं पिठलं - भाकरी आणि भाजणीचं थालीपीठ प्रसिद्ध आहे.
हॉटेल यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करीत आहे. पिठलं-भाकरीसोबत मिरचीचा झणझणीत ठेचा आणि गरमागरम भात, अशी पिठल्याची थाळीच इथं मिळते. गरमागरम भातावर पिठलं आणि तुपाची धार घालून खायला खवय्यांची पसंती आहे. याचबरोबरच भरलं वांगं, उसळ थाळी, शिरा आणि मिसळ असे पदार्थही इथं मिळतात. हे हॉटेल सकाळी लवकर सुरू होतं. मात्र, पिठलं-भाकरी सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेतच मिळते. 'अभिरुची' हॉटेलच्या सुरूर इथंच दोन शाखा आहेत. पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील शाखा ही पहिली शाखा. या ठिकाणी सुरुवातीला वडापाव, मिसळ आणि चहाविक्री केली जात होती. नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि मागणीमुळे व्यवसायाचा विस्तार करण्यात आल्याचं, हॉटेलचे मालक निलेश चव्हाण यांनी सांगितलं. हॉटेलमध्ये स्वच्छता आहेच; शिवाय स्वच्छतागृहातही ती राखल्यानं हे हॉटेल प्राधान्यक्रमावर असल्याचं इथं आलेल्या प्रवाशांनी सांगितलं.
कसं जाल?
पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाताना कात्रज घातमार्गे किंवा कात्रजच्या नवीन बोगद्यापासून सुमारे ६७ किलोमीटर अंतरावर सुरूर हे गाव आहे. याच ठिकाणी रस्त्याच्या दोन्हीं बाजूस 'अभिरुची' हॉटेल आहे. सुरूरपासून उजवीकडे वळून महाबळेश्वरला जाता येत असल्यानं या परिसराला 'महाबळेश्वर फाटा' असंही म्हटलं जातं.8) अस्सल कोल्हापुरी लोणी मटण (Highway Food)
कोल्हापूरला आला असाल आणि अस्सल कोल्हापुरी लोणी मटणाचा किंवा मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तुम्हाला कोल्हापुरातील प्रसिद्ध आझाद चौक गाठावा लागेल. आझाद चौकातल्या हॉटेल 'कृष्णा डिलक्स' चं स्वरूप अगदी एखाद्या खानावळीसारखं असलं, तरी चव एकदम हट के आहे. इथलं झणझणीत लोणी मटण प्रसिद्ध असुन, खवय्यांची सर्वाधिक पसंती या मटणाला मिळते. गेल्या ४५ वर्षापासून कोल्हापूर शहर आणि परिसरात पर्यटनासाठी किंवा या पुणे-कोल्हापूर महामार्गानं प्रवास करणाच्यांची या हॉटेलला पसंती आहे. लोणी मटणाबरोबरच खर्डा मटणासह विविध मांसाहारी पदार्थांच्या थाळीचा आस्वाद इथं घेता येतो. 'कृष्णा' स्पेशल थाळीमध्ये लोणी मटण, मटण फ्राय, अंडाकरी, तांबडा-पांढरा रस्सा, सोलकढी आणि बिर्याणी मिळते, तर लोणी मटण थाळी, मटण फ्राय थाळी, चिकन स्पेशल थाळी, चिकन फ्राय थाळी, अंडाकरी थाळी या प्रकारच्या मांसाहारी थाळ्यांचा इथं आनंद घेता येतो. मांसाहारीबरोबरच शाकाहारी खवय्यांनाही इथं अस्सल कोल्हापुरी झणझणीत जेवणाचा आनंद घेता येईल. त्यात पनीर भाजी, उसळ, भाजी, दहीवाटी, वरणवाटी, सोलकढी, भात, श्रीखंड असे पदार्थ मिळतात. या हॉटेलची सुरुवात ४५ वर्षापूर्वी गणपतराव साळोखे यांनी केली होती. आता या व्यवसायात तिसऱ्या पिढीच पदार्पण झाल आहे. इथली वैशिष्ट्य म्हणजे पदार्थ बनवण्यासाठी कोल्हापुरी पद्धतीच्या घरगुती मसालांचा वापर केला जातो. दुपारी एक ते दुपारी साडेतीन आणि रात्री आठ ते अकरा या वेळेत हे हॉटेल सुरू असत.
कसं जाल?
कोल्हापूर शहरात प्रवेश केल्यानंतर छत्रपती राजाराम रस्त्यामार्गे रविवार पेठेतील आझाद चौकात हे ठिकाण आहे.हेही महत्वाचं ...
१) मुंबई-बेंगळुरू महामार्गावर स्वच्छ स्वच्छतागृहांची कमतरता जाणवते. रेस्तरोंना चांगल्या रेस्तरोंमध्येच अशी स्वच्छतागृहं उपलब्ध होतील.
२) या महामार्गावर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग पॉइंट खूप कमी आहेत; त्यामुळे तुमच्या वाहनांची बॅटरी पूर्ण चार्ज करूनच प्रवासाला सुरुवात करा.
३) सातारा ते कोल्हापूरदरम्यान संपूर्ण महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यानं अनेक ठिकाणी मार्ग वळवले आहेत; त्यामुळे वाहन चालवताना खबरदारी बाळगा. मुख्यतः रात्रीचा प्रवास बेताच्या वेगानं आणि काळजीपूर्वक करावा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
२) या महामार्गावर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग पॉइंट खूप कमी आहेत; त्यामुळे तुमच्या वाहनांची बॅटरी पूर्ण चार्ज करूनच प्रवासाला सुरुवात करा.
३) सातारा ते कोल्हापूरदरम्यान संपूर्ण महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यानं अनेक ठिकाणी मार्ग वळवले आहेत; त्यामुळे वाहन चालवताना खबरदारी बाळगा. मुख्यतः रात्रीचा प्रवास बेताच्या वेगानं आणि काळजीपूर्वक करावा.
Read Also:-
1) Viral News : बापरे २४ तास सुरक्षा असलेल कोकणातील झाड, शंभर कोटींचं झाड तुम्ही कधी पाहिले आहे का ?
2) OpenAI's Secret Weapon: Is Q-Star Humanity's Last Stand : ओपनएआई का गुप्त हथियार: क्या क्यू-स्टार मानवता के लिए खतरा है?