Translate

IT Hub in Bangalore : काचेच्या कडेकोट भिंतीआड...

IT Hub in Bangalore : नवतरुण वर्गासाठी कर्नाटक म्हणजे आयटी हब. करिअरच्या नव्या वळणासाठी बेंगळुरूची वाट धरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक. पण कर्नाटक सरकारने आयटी उद्योगांच्या भल्यासाठी कर्मचाऱ्यांना जाचक ठरणारे कामाचे तास वाढवणारे विधेयक आणले आहे. दिवसाला १४ तास काम करण्याची मुभा देणारे हे विधेयक आयटी वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.


IT Hub in Bangalore : काचेच्या कडेकोट भिंतीआड...

IT Hub in Bangalore


साधारण वर्षभरापूर्वी 'इन्फोसिस' चे सहसंस्थापक असलेल्या ७७वर्षीय नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्याला ७० तास झोकून काम करण्याचे आवाहन केले. याचा संबंध त्यांनी देशाची आर्थिक प्रगती साधण्याशी जोडला. जोडीला त्यांनी देशातील गरीब शेतकरी व कारखान्यांतील कामगारांच्या कष्टप्रद कामांचा दाखला दिला. स्वतः आपण आठवड्यातील सहा दिवस रोज सकाळी ६.२० वाजता कसे कार्यालय गाठायचो आणि रात्री साडेआठपर्यंत काम करायचो याच्याही आठवणी जागवल्या. मूर्ती यांचा तो सल्ला न रुचलेल्यांना त्यांनी आपल्याला पाश्चिमात्य मित्र, अनेक अनिवासी भारतीय व देशातील 'गुड पीपल' यांच्याकडून समर्थन लाभल्याचेही सुनावले... वर्षभरानंतर मूर्ती यांचा हा सल्ला कर्नाटक सरकारने उचलून धरल्याचे चित्र दिसत आहे.

हे जरूर वाचा:- Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे?

'कर्नाटक दुकाने व व्यावसायिक आस्थापना कायदा, १९६१' मध्ये दुरुस्ती करून कर्मचारी-तंत्रज्ञांना आठवड्याला ७० तासांपर्यंत म्हणजेच पाच दिवसांच्या आठवड्यात प्रति दिन १४ तास काम करून घेण्याची मुभा देण्याचे विधेयक आणण्याची तयारी कर्नाटक राज्य सरकारने केली आहे. ही दुरुस्ती म्हणजे स्टार्ट अप, बीपीओ व आयटी कंपन्यांना राज्यात टिकवून ठेवण्याचा व नव्यांना आकर्षित करण्यासाठीची उद्योगधार्जिणी पावले असल्याची टीका होत आहे. अलीकडेच कर्नाटक सरकारने खासगी क्षेत्रात कन्नडिगांना आरक्षण देण्याचा कायदा करण्यासाठी बाह्या सरसावून प्रांतिक वादाला फोडणी दिली आणि अखेरीस आपल्याच निर्णयापासून मागे हटण्याची नामुष्की ओढवून घेतली. आता कामगार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीही अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कर्नाटकचा सध्याचा कामगार कायदा दिवसाला कमाल १२ तास काम करवून घेण्याची परवानगी देतो. त्यामध्ये दहा तासांची कामाची पाळी व कमाल दोन तासांपर्यंतचे जादा काम (ओव्हरटाइम) अंतर्भूत आहे. प्रस्तावित दुरुस्ती अंमलात आल्यास या क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांकडून कंपन्यांना तीन महिन्यांत १२५ तास जादा काम करवून घेता येईल. या नियमामुळे सध्याच्या तीन पाळ्यांऐवजी दोन पाळ्यांमध्येच काम करून घेता येईल. यामुळे एक तृतीयांश कर्मचारी अधिकचे ठरतील व कंपन्यांचा नफ्याचा आलेख झेप घेईल. ही दुरुस्ती उद्योगधार्जिणी असली, तरी त्यामागे कर्नाटकच्या आयटी प्राबल्याला तेलंगणाशी असलेली स्पर्धा कारणीभूत आहे.

कर्नाटक सरकारला सध्या आयटी क्षेत्रातील बेंगळुरूचे अव्वल स्थान टिकवण्याचे आव्हान आहे. देशातील ३४ टक्के आयटी निर्यात बेंगळुरूतून होते. गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, amazon, ओरॅकल, एचपी, डेल, सीमेन्स, कॉग्निझंट, डेलॉइट, इंटेल, एचसीएल यांसह जगातील ८० टक्के महाकाय आयटी कंपन्यांची कार्यालये बेंगळुरूमध्ये आहेत. चीनमधील शेनझेन, जर्मनीचे बर्लिन आणि अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली यांना मागे सारून जगातील सर्वांत विशाल आयटी क्लस्टर होण्याच्या दिशेने बेंगळुरूने वेग धरला आहे. पण गेल्या काही वर्षांत आयटी उद्योगातील रोजगार व महसुलाच्या स्पर्धेत हैदराबाद शहर बेंगळुरूच्या निकट येऊ लागले आहे. बेंगळुरूनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावरील आयटी सिटी असलेल्या हैदराबादमध्येही १९९० पासून असंख्य बड्या आयटी कंपन्यांनी आपली कार्यालये थाटली आहेत. बेंगळुरूच्या तुलनेत हैदराबादमधील जमिनीचे व कार्यालयांचे भाव कमी आहेत. सन २०२१ मध्ये हैदराबादमध्ये १२ लाख ६० हजार चौरस फूट जागेत नवी कार्यालये सुरू झाली. मागील वर्षापेक्षा ही झेप १२९ टक्के अधिक होती. शहरात आयटी व संबंधित कंपन्यांसाठी ३४ एसईझेड असून, आणखी ६४ ठिकाणे निश्चित करून सरकारने मान्यताही दिली आहे. यामुळे येत्या काही वर्षांत शहरात नव्या आयटी कंपन्यांचे बस्तान व इतरांचा विस्तार अपेक्षित आहे. सन २०२२-२३ मध्ये तेलंगणाच्या आयटी निर्यातीत ३१ टक्के वाढ झालीच, शिवाय रोजगारनिर्मितीतही १६.२९ टक्के वाढ नोंदवण्यात आली. अर्थातच बेंगळुरू व कर्नाटकच्या महसुलासाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे.

शहरांतर्गत सुखकर प्रवास हा आयटी क्षेत्रात नावीन्याची घडण व कामाचा दर्जासुधार यासाठी महत्त्वाचा घटक ठरत आहे. हा लेख लिहित असताना जगभरातील शहरांच्या रस्ते वाहतुकीची सद्यस्थिती दर्शवणाऱ्या एका जगविख्यात डच कंपनीच्या वेबसाइटवर बेंगळुरूत दुपारच्या वेळेतही ३६८ ठिकाणी वाहतूक कोंडी दर्शवत होती व दहा किमीसाठीच्या रस्तेप्रवासाचा वेळ ३६ मिनिटांपर्यंत वाढला होता. प्रवासातील वाढीव वेळ व वाढत्या जीवनखर्चामुळे बेंगळुरूऐवजी इतर शहरांची वाट धरणाऱ्या तरुणाईच्या संख्येत अलीकडे वाढ होत आहे. बेंगळुरूतील बड्या आयटी कंपन्यांमध्ये अनुभव घेऊन व वेतनाचा आकडा वाढवून काही काळानंतर पुन्हा पुणे, हैदराबाद, मुंबईला जवळ केले जात आहे. बेंगळुरूतील वाहतूक कोंडी देशात सर्वांत वाईट व जगात सहाव्या क्रमांकावर असताना, हैदराबादमधील प्रशस्त रस्त्यांमुळे प्रवास तुलनेने सुकर आहे. घरभाडे, वाहतूक व जेवणखाण्याचा खर्च उतरणीला आणणे आता बेंगळुरूसाठी अशक्यप्राय आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम बेंगळुरूच्या आयटी क्षेत्रातील उत्पादकतेवर होणे साहजिक आहे. त्यावर कामाचे तास वाढवण्याचा उतारा कर्नाटकने शोधला आहे; तो जाचक तर आहेच, पण व्यवहार्यही नाही.

IT Hub in Bangalore

कर्मचारी किती तास लॅपटॉपसमोर बसून दिलेले काम (टास्क) पूर्ण करतो, कामाचे तास भरतो की नाही, यासाठी अनेक आयटी कंपन्यांनी 'एम्प्लॉई मॉनिटरिंग सिस्टीम' चा हेर मागे लावला आहे. प्रोग्रामिंग, कोडिंग व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या टीममधील सहकाऱ्यासोबत सातत्याने फोनवरून संपर्कात राहावे लागत असतानाही हा कालावधी अनुत्पादक (नॉन प्रॉडक्टिव्ह) म्हणून गणला जात आहे. तीन-चार वर्षे वेतनवाढीपासून वंचित ठेवले जात आहे. एखादा टास्क किंवा प्रोजेक्टकाळात साप्ताहिक सुट्ट्यांवरही गदा येत आहे. कामगार कायद्यांच्या नियंत्रणाबाहेर राहिल्याने प्रत्येक कंपनीकडून आपापले स्वतंत्र जाचक नियम बनवले जात आहेत... पण केवळ महसूल देणारे क्षेत्र एवढीच ओळख उरलेल्या आयटी कंपन्यांच्या काचेच्या भिंतींच्या आत डोकवण्यास कर्नाटकसारख्या राज्याची तयारीच नाही.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.

Read Also:- 

1) Viral News : बापरे २४ तास सुरक्षा असलेल कोकणातील झाड, शंभर कोटींचं झाड तुम्ही कधी पाहिले आहे का ?


2) Lakshadweep Tour Places : 'लक्षद्वीप' - ‘गुगल सर्च’ मध्ये ट्रेडिंगमध्ये चर्चेत असणाऱ्या बेटाविषयी माहिती.


3) Highway Food : दाल-बाटी, सुक्क मटण आणि बरंच काही.. तर या हायवे फूडला एकदा नक्की भेट द्या!


4) dandpatta : लवलव करी धारदार पातं


5) top 10 patanjali products : पतंजलि के 10 गजब के प्रोडक्ट्स जो आपको जरूर ट्राय करने चाहिए.


6) Vantara Zoo : अनंत अंबानी यांचे 'वनतारा' हे प्राणिसंग्रहालय नव्हे; तर ते एक प्राणिसेवा केंद्र होण्यामागे काय रहस्य आहे? 


7) America's Fire Mystery: Why Can't They Stop the Flames? अमेरीकेत लागलेल्या आगीची काय भानगड आहे, टेक्नॉलॉजीचा डंका वाजवतात यांना साधी आग का विझवता येत नाही?

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.